Ahilyanagar News : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत केवळ कुटुंबच शिल्लक राहिले आहे. त्यांच्यामुळे आमदार, खासदार निघून गेले आणि त्यांच्या धोरणांमुळेच मुंबईतून मराठी माणूस हद्दपार झाल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील उमेदवार नारायण राणे यांनी गुरुवारी येथे केला. महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या वडाळ्यातील प्रचार सभेत ते बोलत होते.
ते म्हणाले की, ठाकरे विक्षिप्त माणूस असून सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहेत. मोदींनी जगभरात नावलौकिक मिळवले.
ठाकरेंनी मात्र हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचे नाव शरद पवार यांच्या नादाला लागून घालवले. ठाकरेंच्या आडमुठ्या स्वभावामुळे डोळ्यादेखत आमदार, खासदार सोडून गेले. लालबाग – परळ हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता.
येथील बहुतांशी लोकांना ठाकरेंमुळे मुंबई सोडावी लागली. आता त्यांच्याकडे नावाला लोक उरली आहेत. शिवसेनेत असताना उद्धव ठाकरेंच्या राहणीमान आणि कर्तृत्वाबाबत आपण बाळासाहेबांसमोर आक्षेप नोंदवला होता.
उद्धव ठाकरे कर्तृत्वशून्य माणूस असून त्यांना कसलाही अनुभव नसल्याचा हल्लाबोलही राणे यांनी यावेळी केला. शिवसेना नेते संजय राऊत यांना नाल्यातील गटार ओकतात, अशी जहरी टीकाही यावेळी माजी मंत्री नारायण राणे यांनी केली.
देशाला विकसित आत्मनिर्भर बनवायचे असेल तर मोदींशिवाय पर्याय नाही. मोदींना पुन्हा पंतप्रधान करून हॅट्ट्रिक करायची आहे. त्यांच्याविरोधात राहुल गांधी आहेत.
हा माणूस दहा मिनिटे सभागृहात जागेवर बसत नाही, तो देशाचा काय विकास करणार ? आता महिलांना एक लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे; पण पैसे कोणाच्या खात्यातून देणार? असा सवाल करत राणेंनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले.
इंडिया आघाडीकडून भाजप संविधान बदलणार असल्याचा आरोप होत आहे. मात्र, काँग्रेसने सत्ताकाळात ८० वेळा संविधानात बदल केल्याचा आरोप राणे यांनी केला.
राहुल शेवाळे महायुतीचे उमेदवार असून दोन वेळा खासदार राहिले आहेत. यापूर्वी नगरसेवक आणि स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनसुद्धा त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.
या काळात त्यांनी मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य केले आहे. फक्त स्वार्थ पाहणाऱ्या शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीला या निवडणुकीत मत देऊ नका, असे आवाहन राणेंनी मतदारांना केले.