Sujay Vikhe Patil On Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्रातील मोदी सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात 2019 मध्ये झाली. तेव्हापासून ही योजना अविरतपणे सुरू आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाचा लाभ दिला जात आहे. दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळतोय.
म्हणजेच एका आर्थिक वर्षात शेतकऱ्यांना तीन हप्ते मिळतात. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत पात्र शेतकऱ्यांना 16 हप्ते देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या योजनेचा पुढील सतरावा हप्ता हा लोकसभा निवडणुका झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना वितरित केला जाऊ शकतो असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये होत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, या योजनेचा पुढील सतरावा हप्ता जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो. दरम्यान, सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यासहित संपूर्ण राज्यभर महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून जोरदार प्रचार सुरू आहे.
अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीसाठी जय्यत तयारी करत आहेत. दरम्यान, सुजय विखे पाटील यांनी नुकतीच पीएम किसान योजनेबाबतची माहिती दिली आहे.
या योजनेचा अहिल्यानगर मतदारसंघातील किती शेतकऱ्यांना लाभ मिळतोय, आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती निधी मिळाला आहे, याबाबत खासदार सुजय विखे पाटील यांनी मोठी माहिती दिली आहे.
खा. सुजय विखे पाटील काय म्हटलेत ?
सुजय विखे पाटील यांनी, शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या योजना खूपच महत्त्वाच्या आहेत. गेल्या दहा वर्षाच्या काळात कृषी क्षेत्राला आत्मनिर्भर बनवण्याचे काम सरकारने केले आहे. कृषी क्षेत्रासाठी घेतल्या गेलेल्या निर्णयाचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे.
पीएम किसान अंतर्गत जिल्ह्यातील २ लाख ८२ हजार ३७९ शेतक-यांना ५६ कोटी ४७ लाख ४ हजार रुपयांचे अनुदान मिळाले आहे, अशी माहिती दिली आहे. याशिवाय त्यांनी सरकारने शेतकऱ्यांना खतासाठी अनुदान उपलब्ध करून दिले असल्याचे सांगितले आहे.
याशिवाय शेतकऱ्यांना शेतीविषयक ज्ञान एकाच छताखाली मिळावे यासाठी सरकारने समृद्धी केंद्राची स्थापना केली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या मतदार संघातलील ३ लाख २५ हजार २८६ शेतक-यांना ३६५ कोटी ६५ लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली गेली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.
शिवाय, ऊसाच्या हमीभावात सरकारने वेळोवेळी वाढ केली आहे. तसेच पुढे बोलताना खासदार महोदयांनी प्रमुख पीकांकरीता हमीभावाची शाश्वती देताना अन्य २२ उत्पादीत पिकांनाही हमीभाव देण्याची हमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्प पत्राच्या माध्यमातून दिली असल्याचे म्हटले आहे.