Ahilyanagar News
Ahilyanagar News

Ahilyanagar News : नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि.१३) मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासन त्याचप्रमाणे सामाजिक संघटनांनी जनजागृती केली होती.

मात्र त्यास म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे स्पष्ट झाले. नगर दक्षिणेत एकूण ६३.७७ तर शिर्डीसाठी ६३.०३ इतके मतदान झाले.

उन्हाळा असल्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्ह्यात सर्वात कमी मतदान नगर शहरात झाले तर सर्वात जास्त मतदान राहुरी विधानसभा मतदारसंघात झाले.

नगरला ५७.६० टक्के तर राहुरीला ६९.७९ टक्के इतके मतदान झाले. नगरला कमी झालेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार, याची चर्चा आता राजकिय वर्तुळात जोरदारपणे रंगू लागली आहे.

नगर दक्षिण व शिर्डी लोकसभा मतदारसंघात प्रत्येकी ६ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. लोकसभेची निवडणूक ही आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रंगीत तालीम ठरली आहे.

नगर दक्षिणेतून महायुतीचे विद्यमान खासदार सुजय विखे विरुद्ध महाविकास आघाडीचे माजी आमदार निलेश लंके यांच्यात काट्याची टक्कर झाली.

लंके यांचे होम पिच असलेल्या पारनेर मतदारसंघात ६३.९७ टक्के मतदान झाले. नगर शहरातील ३ लाख २ हजार ८३ मतदारांपैकी १ लाख ७४ हजार मतदारांची मतदानाचा हक्क बजावला. राहुरी विधानसभेसाठी ३ लाख ११ हजार ७४५ मतदारांपैकी २ लाख १७ हजार ५६५ मतदारांनी मतदान केले.

शेवगावला ६२.७४, श्रीगोंद्याला ६२.५४ तर कर्जत-जामखेडला ६५.८१ टक्के इतके मतदान झाले. मतदान प्रक्रिया किरकोळ प्रकार वगळता शांततेत पार पडली. पुढील महिन्यात म्हणजे ४ जूनला मतमोजणी होणार असल्याने निकालाकडे सर्वांचे आतापासूनच लक्ष लागले आहे,

गावोगावी तसेच शहरी भागात निकालाबाबत जोरदाररित्या चर्चा रंगल्या आहेत, कुठल्या विधानसभा मतदारसंघात कोणाला किती मताधिक्य मिळणार, याचीही चर्चा होत आहे.

शिर्डीतून एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे, महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौर व वंचितच्या उत्कर्षा रुपवते अशी तिरंगी लढत झाली.

तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? कोण हरणार? याची चर्चा आता सुरु झाली आहे. अकोले मतदारसंघात ५९.८२ टक्के इतके मतदान झाले. तर उर्वरित संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर व नेवासा मतदारसंघात ६० टक्क्यांच्या पुढे मतदान झाले.

नगर लोकसभा
विधानसभा मतदारसंघनिहाय झालेल्या मतदानाची टक्केवारी नगर शहर ५७.६०, शेवगाव ६२.७४, राहुरी ६९.७९, पारनेर ६३.९७, श्रीगोंदे ६२.५४ व कर्जत-जामखेड ६५,८१

शिर्डी लोकसभा
विधानसभा मतदारसंघनिहाय झालेल्या मतदानाची टक्केवारी- अकोले ५९.९८२, संगमनेर ६५.७७, शिर्डी ६३.७७, कोपरगाव ६१.१८, श्रीरामपूर ६४.०८, नेवासा ६३.२९