Ahilyanagar News : एकच नाव व आडनाव असणारे अनेक उमेदवार निवडणूकीत उभे राहातात. त्यावेळी मतदारांचा संभ्रम व गोंधळ उडतो.
गोंधळलेल्या स्थितीत मतदान होते व नंतर काहींना पश्चाताप होतो; परंतु नको त्याला नजरचुकीने मतदान झाल्याने अनेक जण मनस्वी पश्चाताप करून हाताची घडी तोंडावर बोट ठेवणे पसंत करतात.
मतदान यंत्रावर अनुक्रम क्रमांक, उमेदवारी चिन्ह व नाव असते, तरीसुद्धा एकसारखे नाव व आडनावामुळे काहींचा संभ्रम होतो. हे टाळण्याकरिता मतदान यंत्रावर उमेदवाराचा फोटो डिजिटल पद्धतीने असावा, जेणेकरून हवे त्याला मतदान करणे सोयीचे, सोपे व उचित होईल.
निवडणुकीत एकाच नावाचे अर्थात नाव व आडनाव सारखेच असणारे अनेक उमेदवार उभे राहतात. त्यावेळी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होतो. उमेदवारांचे चिन्ह वेगवेगळे असले, तरी नाव एकसारखे असल्याने मतदारांचा मतदान करतेवेळी गोंधळ उडतो.
परिणामी कोणत्यातरी एका उमेदवाराला मतांचा फटका बसतो, तर इतरांना अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळतात. अशी परिस्थिती उद्भवते.
त्यामुळे एकाच नावाचा अर्थात नाव साधर्म्य असणारा उमेदवार देऊन प्रतिस्पर्ध्याचे मतदान घटविण्याच्या दृष्टीने राजकीय डाव टाकला जातो. एकाच नावाची दोन किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवार ईव्हीएमवर असल्याने काही मतदारांकडून घाईगडबडीत ज्याला मत द्यायचे असते त्याऐवजी दुसऱ्याला दिले जाते.
घाईगडबडीत नको त्याला मत दिली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लोकसभा, विधानसभा असो अथवा इतर सार्वत्रिक निवडणुका यामध्ये एकाच नावाची अनेक उमेदवार देऊन मतदारांचा गोंधळ उडवून देण्याची तसेच मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होईल, अशा प्रकारे राजकीय खेळी खेळली जाते; परंतु सुज्ञ मतदार ही खेळी उधळून लावतात मात्र घाईगडबडीत अथवा गोंधळलेल्या मनस्थितीत काही मतदान या खेळीला बळी पडून नको त्याला मत देऊन पश्चाताप करतात.
एकच नावाचे अनेक उमेदवार असल्याने यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा विजयी होणाऱ्या उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अगदी थोड्या मताने जेव्हा पराभव होतो, तेव्हा नावात सारखेपणा असलेल्या पराभूत उमेदवाराला त्यापेक्षा जास्त मतदान पडलेले असते.
त्यावेळी नाव साधर्म्य अथवा नावात काय जादू आहे याची जाणीव होते व विजयाचा गुलाल घेण्याऐवजी पराभवाची धूळ चाखण्याची वेळ अनेकांवर येते.
त्यावेळी नावात सारखेपणा असलेल्या उमेदवारांना पडलेली मते एक चर्चेचा विषय असतो. नावात सारखेपणा असल्याने उडणारा गोंधळ व होणारा संभ्रम टाळण्याकरिता ईव्हीएम मशीनवर अनुक्रम क्रमांक उमेदवाराचे चिन्ह व नाव दिलेले असते मात्र तरीसुद्धा मतदान भलतीकडे जाते त्यात निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्यात जर उमेदवार कमी पडले तर ही स्थिती मोठ्या प्रमाणात उद्भवते.
राज्यात व देशात सध्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सुरू आहे या निवडणुकीत सुद्धा अनेक ठिकाणी एकाच नावाची अर्थात नाव साधर्म्य असणारी अनेक उमेदवार उभे आहेत. या प्रकरणी काही जण न्यायालयात गेले होते; मात्र त्याचा त्यांना फायदा झाला नाही.
मतदारांमध्ये नाव साधर्म्य असल्याने होणारी गोंधळलेली परिस्थिती अथवा अथवा संभ्रम दूर करण्यासाठी ईव्हीएम मशीनवर अर्थात मतदान यंत्रावर उमेदवारांचे फोटो डिजिटल रित्या असणे एक चांगला पर्याय असू शकतो.