Ahilyanagar News : श्रीगोंदे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (१३ मे) मतदान झाले. श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघात ६७.९० टक्के इतके विक्रमी झाले. मागील वेळी ६४.७७ टक्के मतदान झाले होते.
यंदा मतदानाचा टक्का वाढल्याने तो कोणाच्या पथ्यावर पडणार, याबाबत गावागावात पारावर चर्चा झडत आहेत. मात्र, त्यामुळे सर्वच उमेदवारींची धडधड वाढली आहे.
भाजप उमेदवार खा. डॉ. सुजय विखे यांच्यासाठी आ. बबनराव पाचपुते यांचे पूत्र विक्रम पाचपुते, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे, राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा, फेडरेशन सभापती दत्तात्रय पानसरे, शरद नवले, अण्णासाहेब शेलार,
बाळासाहेब गिरमकर यांनी खिंड लढवली, तर मविआचे उमेदवार नीलेश लंके यांच्यासाठी माजी आ. राहुल जगताप, बाबासाहेब भोस, घनशाम शेलार, मनोहर पोटे, बाळासाहेब दुतारे, प्रशांत दरेकर, हरिदास शिर्के यांनी प्रचाराची धुरा सांभाळली, लंके यांच्यासाठी शरद पवार,
खा. डॉ. अमोल कोल्हे, खा. संजय राऊत, आ. बाळासाहेब थोरात यांनी सभा घेतल्या, तर विखे यांच्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे, हर्षवर्धन पाटील यांच्या सभा झाल्या. सांगता सभेला केंद्रिय मंत्री नितीन गडकरी येणार होते, पण हवामान बिघडल्याने त्यांना येता आले नाही.
या निवडणुकीत कांदानिर्यात बंदी, दूध दर पाटपाण्यावर जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघाला नगर तालुक्यातील वाळकी आणि चिचोंडी पाटील गट जोडलेले आहेत. या गावांमध्ये साकळाई उपसा सिंचन प्रकल्पावरून काहीशी नाराजी होती.
त्याचवेळी नगर-सोलापूर राज्यमार्ग झाल्याने या भागातील मतदार कोणाला झुकते माप देतात, याकडेही लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब हराळ यांनी विखे गट सोडून लंके यांचा प्रचार केल्याने,
त्यांना किती साथ मिळते, यावरही बरेच काही अवलंबून आहे. ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे