जिल्हा परिषदेत कपात केलेल्या रकमा संबंधित खात्यांवर जमा न करता स्वतःच्या खात्यावर घेतल्याप्रकरणी उघडकीस आलेल्या घोटाळ्यातील दोन जणांना निलंबित केले आहे.हे कर्मचारी कार्यरत असल्यापासूनच्या कालावधीची म्हणजेच चार ते पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधीची चौकशी जिल्हा परिषद करणार आहे.

बांधकाम उत्तर विभागातील एका कर्मचाऱ्याने ठेकेदाराच्या कपात केलेल्या रकमा संबंधित बँकेच्या खात्यांवर न भरता स्वतःच्या खात्यावर भरल्याने लाखोंचा घोटाळा उघडकीस आला.

लोकल ऑडिट पथक तसेच अंतर्गत लेखा विभागाच्या परीक्षणातही हा प्रकार उघडकीस न आल्याने प्रशासकीय कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून संबंधित कर्मचारी कार्यरत असल्यापासूनच्या कालावधीतील चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी संबंधित कर्मचाऱ्यांकडून यापूर्वी असे काही प्रकार घडले होते का,याचीही तपासणी केली आहे.

या चौकशी अंतर्गत बँकेचे स्टेटमेंट व कॅशबुक यांची पडताळणी करणे सुद्धा आवश्यक आहे.तसेच भविष्य निर्वाहच्या रकमा व इतर कपात केलेल्या रकमा विभाग प्रमुखांकडे प्रलंबित आहेत का ? याचीही पडताळणी करावी.

अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून दबक्या आवाजात केली जात आहे.मुख्य लेखा व वित्त अधिकारी या प्रकरणात सखोल चौकशी करणार का? असाहि प्रश्न यावेळी उपस्थित केला जात आहे.